चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सुनील पाटील (वय ४०) या १ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावरून प्रवासासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.
गर्दीमुळे चोरी नेमकी कधी आणि कशी झाली हे त्यांना तत्काळ समजू शकले नाही. काही वेळानंतर गळ्यातील मंगळसूत्र नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बसस्थानक परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी दागिने परिधान करताना अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
