साईमत, जळगाव : प्रतिनिधी
अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचा राग येऊन महिला डॉक्टराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनासमोर घडला. याप्रकरणी रविवारी, २४ सप्टेंबर रेाजी दुपारी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, महिला डॉक्टरची आंजोली नारखेडे ही मैत्रीण आहे. तसेच आंजोली नारखेडे यांनी महिला डॉक्टरची बदनामी केली म्हणून अब्रुनुकसानीचा दावा जळगाव न्यायालयात दाखल केला आहे. त्याचा राग आल्याने आंजोली नारखेडे हिने हेमंत जाधव आणि एक अनोळखी या दोघांच्या मदतीने चिथावणी दिली. त्या दोघांनी बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनाजवळ महिला डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करीत ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. याप्रकरणी महिला डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.