साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरात एम.एम.कॉलेजच्या चौकापासून तर वरखेडी नाक्यावरपर्यंत हायवेवर दोन्ही बाजूने बेकायदेशीरपणे अतिक्रमण वाढविण्यात आलेले आहे. या अतिक्रमणामुळे वाहनांची रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग केली जाते. पार्किंग केलेल्या वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहे. पाचोरा-जारगाव चौफुलीवर बुधवारी, १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एका मण्यार समाजातील गिरड येथील माहेरवाशिण ही पाचोरा शहरातील नूरनी नगर भागातील नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती. यावेळी महिलेला जारगाव चौफुलीवर एका बेकायदेशीर पार्किंगमुळे महिलेचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाचोरा पोलिसांनी तात्काळ वाहनासह चालकास ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.
पाचोरा शहरात अवैध वाहतुकीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अशा वाहतुकीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अवैध वाहतुकीमुळे अपघात प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तसेच रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहने उभी असल्याने चौफुलीवर येणारे-जाणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. मात्र, अवैध वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली कोणी? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? अवैध वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? अशा वाहतुकदारांकडून हप्ते वसुली केले जाते का? अवैध वाहतुकीमुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे महिलेचा अपघात झाला. या घटनेला जबाबदार कोण? असा संताप प्रश्न त्यांचे नातेवाईक प्रशासनाला करीत आहेत.