Government Hospital In Jalgaon : जळगावातील शासकीय रुग्णालयात महिलेची प्रसुती ; तिळ्यांना दिला जन्म

0
32

वैद्यकीय पथकाकडून यशस्वी शस्त्रक्रिया, अधिष्ठातांकडून पथकाचे कौतुक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात विवाहितेची शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी सिझेरियन (प्रसुती) होऊन तिने तिळ्या मुलांना जन्म दिला आहे. रुग्णालयात मातेसह मुलांची प्रसूती सुखरूप पार पडली. वैद्यकीय पथकाच्या यशस्वी कामगिरीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

सपना राठोड (वय २५) यांना प्रसुतीसाठी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात दाखल झाली होती. त्यावेळी महिलेच्या पोटात तीन बाळ असल्याचे निदान झाल्यावर वैद्यकीय पथकाने यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. महिलेने तीन गोंडस मुलांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉ. राहुल कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुरज कोठावदे, वरिष्ठ निवासी डॉक्टर श्रद्धा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ निवासी डॉक्टर माधुरी उदगिरे, डॉ. चंद्रकांत बर्गे, डॉ.श्रेष्ठा शुक्ला, डॉ. श्रीहरी बिरादार, डॉ. मिताली इंगळे यांच्यासह बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, प्रा.डॉ. अंजू पॉल, वरिष्ठ निवासी डॉक्टर ऐश्वर्या मोने, कनिष्ठ निवासी डॉक्टर तासीन सीदा यांनी सहकार्य केले.

मातेसह तिन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित

तिन्ही नवजात मुले अनुक्रमे १.६ किलो, १.९ किलो आणि २.० किलो वजनाची आहे. तिन्ही मुले ठणठणीत आणि निरोगी आहेत. सध्या ती नवजात शिशु अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. महिलेची प्रसूती ही वैद्यकीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील असते. मात्र, आमच्या प्रसुतीशास्त्र आणि भूलतज्ज्ञ टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तिळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आई आणि सर्व तीन मुले पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डॉ. राहुल कातकाडे यांनी दिली.

आरोग्यसेवेचा उत्कृष्ट नमुना ठरली प्रसुती

ही प्रसूती जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कुशलतेचा आणि उत्कृष्ट आरोग्यसेवेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. सपना राठोड आणि त्यांचे कुटुंब आनंदित आहे. तसेच अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील, अधिसेविका संगीता शिंदे यांच्यासह रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकानेही समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here