फायनान्स कंपनीच्या तगाद्याला वैतागून महिलेची आत्महत्या

0
33

सोयगाव क्रेडिट ॲक्सेस फायनान्स कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: निवेदनाद्वारे मागणी

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

तालुक्यातील कोल्हे येथील शरद पाटील यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्व. सविता शरद पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सोयगाव येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व वसूली अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय देण्यात यावा, अश्या आशयाच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील शरद पुंडलिक पाटील हे त्यांच्या पत्नी सविता व मुलगा तुषार ते एकत्र राहत होते. मागील काळात त्यांच्या शेतात पिक न आल्याने व त्यांच्या मुलीच्या लग्नाला खर्च आल्यामुळे ते कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांनी गरजेपोटी सोयगाव तालुक्यातील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीकडून त्यांच्या पत्नी सविता हिच्या नावावर कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर त्यांनी कर्जाच्या हप्त्याची परतफेड नियमितपणे वेळेवर भरणा करीत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात घरात आजारपण व हाताला काम नसल्याने त्यांना घरात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. म्हणून त्यांनी क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची उर्वरित परतफेड ते वेळेवर करु शकले नाही. त्यामुळे हप्त्याची रक्कम थकीत झाल्यानंतर क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात होता. संबंधित कंपनीमध्ये काम करणारे प्रदीप सर व आग्यश्री (दोघांचेही पूर्ण नाव माहीत नाही) हे वारंवार त्यांच्या घरी रात्री-बेरात्री कर्ज वसूलीसाठी बेकायदेशीर व गैरकृत्य व कायदा हातात घेऊन कर्जदार सविताकडे पैसे भरण्यासाठी तगादा लावत होते. पैसे नाही दिले म्हणून त्यांनी कर्जदार मयत महिलेस सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण करून तुला जेलमध्ये टाकु, अशा धमक्या दिल्या.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन दोषींना तात्काळ अटक करा

फायनान्स कंपनीचे अधिकारी, कर्मचारी प्रदीप आणि भाग्यश्री हे शुक्रवारी, १३ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास कर्जदार महिलेच्या घरी आले आणि कर्जदार महिलेला उठविण्यासाठी प्रदीप याने त्यांच्या घरावर दगडफेक केली. घराचा विद्युत पुरवठा खंडित केला. वसूलीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी अंधाराचा फायदा घेत महिलेला जबर मारहाण व अश्लील शिवीगाळ करत फाशी घे, नाही तर काहीही कर पण पैसे भर, अशी धमकी दिली. त्यामुळे सविताबाई ही तणावाखाली होती. त्याच विवंचनेतून सविताबाई हिने गेल्या १८ सप्टेंबर २०२४ रोजी ती घरी एकटी असतांना घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली.

सविताबाईचा मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सोयगाव येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर सविताबाईच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here