Government Hospital Gate : शासकीय रुग्णालयाच्या गेटमधून वाहनांना बंदीमुळे परिसराने घेतला मोकळा श्वास

0
3

अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांची कडक भूमिका, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्याही वाहनांना बंदी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मधून गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह इतरांची खासगी वाहनेमध्ये येण्यास बंदी घातली असल्याने आता रुग्णालयाचा परिसर मोकळा श्वास घेत आहे. अनेकदा सुरक्षा रक्षकांचे नागरिकांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वाद होतात. अनेकजण “भाऊं”सह “साहेबां”ना फोन लावतात. मात्र, कुठलेही वाहन सोडले जात नसल्याने अधिष्ठातांनी सुरक्षारक्षकांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे.

रुग्णालयांमधील बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर होती. त्यामुळे रुग्णांना आणि रुग्णवाहिकांना पोहोचण्यास अनेकवेळा अडथळा निर्माण होत होता. शहरातील रुग्णालयाच्या आवारात खासगी वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरू होते. जागा दिसेल तेथे दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्या जात असल्याने हॉस्पिटलची सुरक्षितताच धोक्यात आली होती. तसेच, डॉक्टरांना काहींनी मारहाण केली होती. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आठवड्यापूर्वी रुग्णालयातील सर्व घटकांची बैठक घेतली. आपत्कालीन विभागाची सातत्याने पाहणी करून एक “एसओपी” तयार केली. त्यानुसार आता गेटमधूनच डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांसह इतरांची खासगी वाहने आत आणण्यास बंदी घालण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना आता परिसर पूर्ण मोकळा दिसून येत आहे. रुग्णालय परिसर कमालीचा स्वच्छ झाला आहे. रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मध्ये दोन्ही बाजूला लहान गेट बसविली आहेत. या गेटमधून पायी जाणारी माणसे जातील अशी व्यवस्था आहे. आता सुरक्षारक्षकांवर दुचाकीमध्ये आणू न देण्याची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांशी काही नागरिक रोज वाद घालतात. मात्र, एकही वाहन आत येऊ दिले जात नाही आहे. वाहने पार्किंगची सुविधा गेट क्रमांक ३ कडे केली आहे.

केवळ या वाहनांना मिळणार प्रवेश

गेट क्रमांक एकमधून प्रवेश मिळणाऱ्या वाहनांमध्ये रुग्ण आणलेल्या रुग्णवाहिका, आरोपी असलेले पोलीस वाहन, जखमी असलेले रुग्ण घेऊन येणारे खासगी वाहन, शववाहिका यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here