अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मिळाल्यावर दिव्यागांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद
साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी
दिव्यांगांना शासनाच्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नसल्याने दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे, असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६ च्या दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.
त्यानुसार दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे, यासाठी लोहारा येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधींनी पाचोरा तहसीलदार यांना विविध निवेदने दिली होती. अशातच लोहारा येथील स्वस्त धान्य दुकान येथून दिव्यांगाना अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत दिव्यांगाना जानेवारी २०२४ मध्ये अंत्योदय रेशन कार्डचे वाटप केले होते. मात्र, त्यापैकी १२ रेशन कार्ड सुरु करण्यात आले. तसेच २१ दिव्यांगांचे रेशन कार्ड चालू झाल्याचे दिसत नव्हते. अंत्योदय रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी बराच कालावधी उलटल्याने एकता दिव्यांग संस्थेच्या प्रतिनिधींनीच्या पुढाकाराने १० अंत्योदय रेशन कार्ड सुरु करण्यात आले. दरम्यान, अंत्योदय रेशन कार्डचा इष्टांक मंजूर नसल्याचे पाचोरा तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. तसेच उर्वरित रेशन कार्ड लवकरात लवकर इष्टांक मिळाल्यानंतर सुरु करण्यात येतील, असे पाचोरा पुरवठा अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन उज्ज्वल पालीवाल, मापाडी जितेंद्र पालीवाल, एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, सदस्य विकास शिवदे, बाळू जाधव, अनिल चौधरी, विठ्ठल धनगर, अनिल राजपूत, अहमद खान पठाण व गावातील दिव्यांग बांधव, नागरिक, पत्रकार उपस्थित होते.