दोन वर्षापासून दररोज नियमित राबविला जातोय उपक्रम
साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :
नवापूर तालुक्यातील आमलाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्वयंसेवक प्रियंका गावित, बबीता वसावे, रूपाली वसावे, सुवर्णा वसावे, वैशाली वसावे, मीना कोकणी यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनीही स्वयंप्रेरणेने होकार देत रात्र अभ्यासिका सुरू केल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून दररोज नियमित रात्र अभ्यासिका घेतली जात आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्तार अधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांनी कौतुक केले. सर्व स्वयंसेवकाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी सत्कार करून कौतुक केले आहे.
शाळेतून दिलेला अभ्यास विद्यार्थी रात्र अभ्यासिकेत एकत्र बसून पूर्ण करतात. काही अडचण आल्यास स्वयंसेवक त्यांना मदत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास व सराव होऊ लागल्याने गुणवत्तेत वाढ होण्यास मदत झाली. स्वयंसेविका ह्या डीएड् व पदवीधारक असल्याने त्यांच्या अनुभव, शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय गावित, सरपंच अंजना वसावे, शिक्षण प्रेमी विलास वसावे, अमृत गावित हे विविध साहित्य घेऊन मदत करतात. तसेच उपक्रमात सहभागी स्वयंसेवकांना शाळेचे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे, शिक्षिका अलका पाडवी, लिना गावित हे मदत करतात.