साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
शहरासह परिसरातील गुंडागर्दी व टवाळखोरी मोडीत काढणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे वरणगाव पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सांगितले.
वरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची महिनाभरापासून बदली होणार असल्याची चर्चा सुरू असतानांच रावेर येथे बदली झाल्याचे आदेश मंगळवारी रात्री अचानक प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये त्यांनी बुधवारी सकाळीच सहायक पोलीस निरीक्षक आडसुळ यांच्याकडून पदभार स्वीकारला.
सपोनि भरत चौधरी यांनी २०१२ मध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासनात नोकरीचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी अद्यापपर्यंत मुंबई, गडचिरोली जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावले आहे. गडचिरोली जिल्ह्यात असतांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना पोलीस प्रशासनातर्फे दोन वेळा सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची काही महिन्यांसाठी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली होती. आता त्यांच्याकडे वरणगाव पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आल्याने त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्याशी वार्तालाप करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष करुन वरणगाव पोलीस ठाण्यात माझी नियुक्ती केली आहे.
शहर व परिसरातील शांतता कायम रहावी यासाठी प्रथम शहरातील गुंडागर्दी व टवाळखोरी मोडीत काढली जाईल. तसेच वर्दी हीच माझी जात असल्याने पोलिसांच्या वर्दीचा कुणी अपमान केल्यास ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी त्याच्यावर कुठल्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे सर्वसाधारण नागरिकांवर अन्याय केला जाणार नाही. इतकेच नव्हे तर महिला व शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, असे कार्य केले जाईल. तसेच सर्वसाधारण नागरिकांना काही त्रास असल्यास त्यांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता थेट माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी भ्रमणध्वनी सर्वसाधारण नागरिकांसाठी २४ तास सक्रीय राहील, असेही त्यांनी सांगितले.