नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेची मिनी फायनल समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत.
मध्य प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता
इंडिया टुडे, माय ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला १०६-११६, काँग्रेसला १११-१२१ आणि इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात २३० जागा आहेत. येथे बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. २०१८ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा ११६ आकडा गाठला आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे सरकार केवळ १५ महिने टिकू शकले. ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या २२आमदारांनी राजीनामा दिला. यामध्ये ६ मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे स्वतः भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कोर्टाने कमलनाथ यांची फ्लोर टेस्ट करण्याचे आदेश दिले. चाचणीपूर्वी कमलनाथ यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपने बंडखोर आमदारांचे विलीनीकरण केले आणि शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता कायम राखणार
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. तेथील मतांची टक्केवारी ७६.३१ टक्के होती. जी२०१८ च्या तुलनेत (७६.८८) किरकोळ कमी होती. याठिकाणी पहिल्या टप्प्यात २० जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात ७० जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या निकालापूर्वी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत, त्यापैकी ७५ जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा आहे. एक्झिट पोलच्या निकालानुसार काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. एि एबीपी सी व्होटर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला कौल देण्यात आला आहे. याठिकाणी ४१ ते ५३ जागा, तर भाजपला ३६ ते ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना मिळू शकणाऱ्या जागांचे आकडे १ ते ५ पर्यंत आहेत. ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४०-५०, भाजपला ३६-४६ आणि इतरांना १ ते ५ जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण ९० जागा आहेत. बहुमताचा आकडा ४६ आहे. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे ७१, भाजपचे १३, बसपचे २ आणि अजित जोगी यांच्या पक्षाचे ३ आमदार आहेत. एक जागा रिक्त आहे. काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले होते.
राजस्थानात काँग्रेस इतिहास घडवणार ?
राजस्थानच्या निवडणुकीची देशात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यातील संघर्षाची चर्चा झालीच झाली. पण काँग्रेस पक्षाने आपले अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकत्र येत ही निवडणूक लढवली. सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. तोच प्रयत्न सफल होताना दिसून येत आहे. कारण ‘आजतक आणि ॲक्सिस’च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला शंभरीपार जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या तुलनेत मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपला ८० ते १०० जागा मिळू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. राजकीय महत्त्व आणि संभाव्य फायदा ओळखून सचिन पायलट यांनीही वाद टाळून सर्व शक्तिनिशी गेहलोत यांना साथ दिली. तथापि, एबीपी माझा आणि सी-वोटरच्या सर्वेमध्ये भाजपला संधी मिळणार असे दिसत आहे. २०१८ पासून राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १९९३ पासून राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याचा ट्रेंड आहे. येत्या रविवारी मतमोजणी आहे. त्यात भाजपला बहुमत मिळाले तर वसुंधरा राजेच मुख्यमंत्री होणार, की भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणखी कुणाला संधी देणार ते पाहावे लागेल.
तेलंगणात काँग्रेस बहुमताजवळ
गेल्या दोन निवडणुकीत २०१४ आणि २०१८ साली तेलंगणा राज्यात केसीआर यांनी विजय मिळवला होता. यावेळी ते विजयाची हॅट्रिक करणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गेल्यावेळी म्हणजेच २०१८ साली एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता. विधानसभेच्या ११९ जागा असलेल्या तेलंगणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ६० जागांची गरज आहे. बीआरएस प्रमुख केसीआर यांनी २०१८ साली मुदतीआधी विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. ज्याचा त्यांना फायदा देखील झाला होता. तेव्हा पक्षाच्या जागा ६३ वरून ८८ पर्यंत पोहोचल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपला फक्त १ जागा मिळाली होती. यावेळेस न्यूज २४ आणि चाणक्य, टाईम्स नाऊ आणि ईटीजी, इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स या सर्वांनी काँग्रेसच्या विजयाचा दावा केला आहे.