शिवसेना उबाठाकडून उन्मेष पाटील तर रा.काँ.कडून तिघांचा समावेश
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाकडून तिकीट मिळाले तर उन्मेष पाटील हे उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून तीन जणांची नावे पुढे आली आहेत. त्यात माजी आमदार राजीवदादा देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतिश दराडे ह्या तिघांपैकी एक उमेदवार असण्याची शक्यता आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची नुकतीच उमेदवार निवडीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात तिघांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
माजी आमदार राजीवदादा देशमुख आमदार असतांना त्यांनी केलेली विकास कामे, तालुक्यातील पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लावला. एमआयडीसीत उद्योग आणले. शहर व ग्रामीण भागाचा गोपनीय सर्व्हे केल्यावर राजीवदादा देशमुख यांनी उमेदवारी केली पाहिजे, असा जनतेतून सूर उमटत आहे. तिकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील हे विकास दूध संघ, महानंदा डेअरी, राष्ट्रीय विद्यालय संस्थेवर भरघोस अश्या मतांनी निवडून आले आहे. त्यांची लोकप्रियता बघता त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेतही सूत्रांकडून समजते. तसेच तालुक्यातील ‘नवीन फ्रेश चेहरा’ म्हणून सतिश दराडे यांचे सामाजिक क्षेत्रात अनेक कामे आहेत. महाराष्ट्र केसरी घडविण्याचे काम असो किंवा आरोग्याशी निगडित कामे तालुक्यातील अल्पसंख्यांक व इतर समाजातील जवळचे समजले जाणारे सतिश दराडे यांच्याकडे बघितले जाते. तालुक्यातून त्यांच्या नावाला उमेदवारी मिळावी, यासाठी नागरिक इच्छुक आहेत. त्यांचा तालुक्यातील दांडगा संपर्क बघता त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांना जनतेसह समाजातील लोकांनी उमेदवारी तिकीट मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उमेदवारीसाठी कुणाची वर्णी लागणार?
विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणि आचार संहिता लागल्यानंतर पक्षांकडून उमेदवारी ‘फायनल’ होणार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून उबाठाचे उन्मेष पाटील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजीवदादा देशमुख, प्रमोद पाटील, सतिश दराडे यापैकी कुणाची वर्णी लागुन कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.