मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरून अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी, असा खोचक सल्ला दीपाली सय्यद यांनी दिला.
दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवली आहे.दीपाली सय्यद यांच्याबाबत प्रश्न विचारताच संदीप देशपांडे म्हणाले, “आहो सोडा ओ कोण दीपाली सय्यद? कोण विचारतंय तिला? त्या नेमक्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ते आधी सांगा. आपण कुणाला महत्त्व द्यायला हवे, याचाही विचार केला पाहिजे.” प्रसारमाध्यमांना ‘जागर यात्रे’बाबत माहिती देताना संदीप देशपांडे यांनी ही टीका केली.