यावलचा साठवण तलाव, पाइपलाइन कामातील ५ कोटींच्या गैरव्यवहारांचा चौकशी अहवाल गेला कुठे ?

0
3

यावल : प्रतिनिधी

यावल शहराच्या वाढीव हद्दीत विकसित कॉलन्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी यावल नगरपालिकेतर्फे २ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावाचे बांधकाम केले. आणि कॉलनी भागात २ कोटी २९ लाख रुपयाची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. या दोन्ही कामांमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान स्थापत्य अभियंता योगेश मदने आणि सोलापूर येथील अनिल शामराव पाटील, अमळनेर येथील एस.कुमार कन्स्ट्रक्शन यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार माजी नगराध्यक्ष नौशाद तडवी तसेच माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे आणि पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तत्कालिन, जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१४ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्रीसदस्यीय समिती नियुक्त केली होती. तसेच या समितीने ३० दिवसाच्या आत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. परंतु गेल्या दोन वर्षात समितीने कोणताही चौकशी अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
यावलच्या तत्कालीन नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांनी त्यांच्या नावानिशी पाच सदस्यांच्या स्वाक्षरीने दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, पदाधिकारी निलेश गडे,डॉक्टर कुंदन फेगडे,रितेश बारी,योगेश चौधरी,राहुल बारी,परेश नाईक, एडवोकेट गोविंदा बारी, हेमराज फेगडे,व्यंकटेश बारी यांच्यासह २७ जणांनी तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांनी १४ ऑक्टोंबर २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर,जळगाव येथील लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता,तसेच जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी या तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली होती आणि आहे या समितीने दिरंगाई व हलगर्जीपणा न करता ३० दिवसात जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता तरीसुद्धा या समितीने गेल्या दोन वर्षात आपला अहवाल जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठविला नाही त्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे.
यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने व तत्कालीन मुख्याधिकारी आणि या कामाचे वरील नमूद ठेकेदार यांनी संगनमताने अतिरिक्त साठवण तलाव आणि पाईपलाईनचे काम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार, गैरप्रकार केला यावल शहरातील वाढीव हद्दीतील सर्व रस्त्यांचे बारा वाजले व पाईपलाईन जागोजागी फुटत असल्याने रस्त्यावर खड्डे अजूनही जसेच्या तसेच आहेत,नगरपरिषद म्हणजे स्थापत्य अभियंता योगेश मदने आजही ते खड्डे बुजू शकत नाही. रस्त्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहेत अशी यावल शहराची दयनीय अवस्था झाली आहे. इतर अनेक कामांमध्ये सुद्धा विद्यमान मुख्याधिकारी हेमंत निकम हे प्रत्यक्ष खात्री न करता स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्या आर्थिक व्यवहारावरती डोळे झाकून स्वाक्षरी करीत आहेत. त्यामुळे यावल नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील अनेक प्रकरणांना विद्यमान मुख्याधिकारी हेमंत निकम हे सुद्धा जबाबदार ठरतील अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here