घरासमोर साचू लागले पाण्याचे डबके : रहिवाशांमधून संताप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पिंप्राळा शिवारातील सावखेडा रस्त्यावरील सोनी नगरमध्ये दोन गल्लीत रस्त्यांची कामे झाली. मात्र, धनंजय सोनार यांच्या घरापासून ते स्वयंभू महादेव मंदिर परिसरात रस्ते अर्धवट सोडून दिल्याने पहिल्याच अवकाळी पावसामुळे रहिवाश्यांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अशा डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊन लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सोनी नगरातील रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात आ.राजू मामा भोळे यांना नागरिकांनी भेटून आपबीती कथन केल्यावर आमदारांनी परिसरात पर्याय म्हणून मुरूमचा भराव करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ऐन अवकाळी पाऊस पडल्याने थेट घराच्या ओट्यावर पाणीच पाणी साचल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोनी नगरात चार गल्ल्या आहेत. त्यापैकी दोन गल्लीत सिमेंट काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाले. तिसऱ्या गल्लीत अर्धा रस्ता केला. मात्र, अर्धवट रस्ता केल्याने अमृत योजनेच्या नळाचे पाणी आले की, नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचते. त्यात अवकाळी पावसामुळे तर घराच्या दारासमोरपर्यंत पाणी साचले होते. पाणी काढताना नाकी नऊ आले होते.
तसेच रस्त्याबाबत कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, असाही सूर उमटत आहे.
समस्या मांडाव्या तर कुणाकडे ?
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांना विचारले असता, ‘होईल ना लवकरच होईल ना’ असे केवळ आश्वासन दिले जाते. तिसऱ्या गल्लीचा रस्ता होऊन तीन महिने झाले, मात्र अर्धवट रस्ता महादेव मंदिरापर्यंत कधी पूर्ण होईल, असा प्रश्न वार्ड क्रमांक १० मधील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांच्याकडे नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच समस्या मांडाव्या तर कुणाकडे ? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वाट न पाहता लवकरात लवकर अपूर्ण रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी सोनी नगरातील नागरिकांमधून होत आहे.