शासकीय कापूस खरेदी केव्हा सुरू होणार?

0
12

अमरावती : वृत्तसंस्था

यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. त्यामुळे कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात दसऱ्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमंतीमध्ये खरेदी करीत आहेत. दिवाळीनंतरच सीसीआयकडून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारने ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे पण व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
‘सीसीआय’चा ‘सब एजंट’ म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते. पणन महासंघाकडून राज्यात ५० केंद्रावर कापूस खरेदी होत असते.जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी, नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या ११ झोनमध्ये २ टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणनकडून केली जाईल.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
देशात कापूस दरांवर दबाव वाढला आहे. ही स्थिती लक्षात घेता शासनाने खरेदीसंबंधी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार दिला असून, हरियाना, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात सीसीआयने खरेदी सुरू केली आहे. ७०२० रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तेथे दिला जात आहे. सध्या देशात सुमारे सीसीआयचे ५३ खरेदी केंद्र सुरू आहेत. पश्चिम विदर्भात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. दुसरीकडे कापूस प्रक्रिया उद्योग रखडतच सुरू आहे. जिनिंग-प्रेसिंग कारखानदार आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता लक्षात घेता सरकारने बाजारात हस्तक्षेप केला असून, खरेदी सुरू केली
आहे.
गेल्या हंगामातही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकला नाही.गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये कापसाचे भाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.एप्रिलपासून भाव कमी होत गेले. मागच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस ठेवला होता. त्याआधीच्या वर्षात कापसाला शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळाला होता पण गेल्या वर्षी शेतकऱ्यांची निराशा झाली होती.यंदादेखील कापूस दबावातच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here