संसदेत दोन तरुण घुसले तेव्हा भाजपा खासदार पळत सुटले

0
55

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले तरी खासदारांच्या निलंबनावरून जोरदार घमासान चालू आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीतले पक्ष राजधानी दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशात आता बोलण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. देशभरात प्रचंड बेरोजगारी आहे.हे बेरोजगार तरुण सरकारविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. संसदेची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेत घुसून केलेल्या राड्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.
संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा तर आहेच, परंतु त्या तरुणांनी हे आंदोलन का केले? बेरोजगारी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. देशातले तरुण मोबाईलवर किती वेळ वाया घालवतात ते एकदा तपासून पाहा. मी याबद्दल एक सर्वेक्षण करण्यास सुचवले होते. एका संस्थेने हे सर्वेक्षण केले. त्यातून समोर आले की, देशातले तरुण दिवसातले तब्बल साडेसात तास (सात तास ३० मिनिटे) मोबाईलवर वेळ घालवतात. कारण मोदीजींनी त्यांना रोजगार दिलेला नाही. बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत ते तरुण संसदेत घुसले होते.
खासदारांच्या निलंबन प्रकरणावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी संसद भवन परिसरात तीन-चार तरुण घुसले होते. त्यापैकी दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. त्यांना उड्या मारताना आम्ही सर्वांनी पाहिले. ते आत आले, त्यांनी थोडा धूर पसरवला तेव्हा भाजपाचे सगळे खासदार पळून गेले.जे स्वतःला मोठे देशभक्त म्हणवत होते, तेच सर्वात जास्त घाबरले होते.ते तरुण आत कसे आले? त्यांनी स्मोक कॅन तिथे कसे आणले? त्यांनी हे आंदोलन का केलं? त्यांच्या आंदोलनाचं कारण काय? याची उत्तरं हे सरकार देऊ शकतं का? बेरोजगारी हे या आंदोलनामागचं प्रमुख कारण होते कारण या देशातल्या तरुणांच्या हाताला काम नाही.
राहुल गांधी म्हणाले, विरोधकांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारले की, दोन तरुण संसदेत कसे घुसले? त्यावर उत्तर देण्याऐवजी अमित शाह यांनी १५० खासदारांचे निलंबन केले. प्रत्येक खासदार लाखो लोकांची मतं घेऊन आलेला आहे. तुम्ही केवळ त्या १५० खासदारांचा अपमान केला नाही तर देशातल्या ६० टक्के जनतेचे तोंड बंद केलेत. तुम्हाला वाटतेय की, तुम्ही देशातल्या जनतेला भिती दाखवाल आणि जनता घाबरेल पण तसे होणार नाही. तुम्ही अग्निवीरसारखी योजना आणलीत आणि देशातल्या तरुणांची देशभक्तीची भावना हिरावली. जेव्हा हेच तरुण अग्निवीर योजनेविरोधात उभे राहिले तेव्हा तुम्ही त्यांना म्हणालात, आंदोलन केलेंत तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here