शिवजयंतीत जिल्हाधिकाऱ्यांचा भूतदये’चा प्रत्यय येतो तेव्हा…
जळगाव। विशेष प्रतिनिधी
जळगाव शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी होत असतांना, रथावर निघालेली मिरवणूक सर्वत्र उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण… अचानक रथाला जुंपलेल्या घोड्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे लक्ष वेधले जाते. रथाला जुंपलेला घोडा काहीसा अस्वस्थ त्यांना वाटला. त्यांनी घोड्याजवळ जावून त्याचे निरीक्षण केले, पशूवैद्यकीय डॉक्टरांना ही त्यांनी घोड्याच्या प्रकृतीची माहिती घेण्याविषयी सांगितले.
पशूवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता घोडा आजारी असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने घोड्यावर उपचार करण्यात आले आणि रथातून घोड्याला वेगळे केले. ही घटना किंवा हा प्रसंग ‘ भूत दया परमोधर्म याची प्रचिती आणून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीत ‘भूतदया परमो धर्माचे पालन केले जाते. प्राणी मात्रांवर प्रेम करा, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवा हा संदेशच श्री. प्रसाद यांच्या संवेदनेतून स्पष्ट होतो.
कायद्याचे पालन न केल्यास कारवाई
या प्रसंगातून एक नवीन आदेशच जिल्हा प्रशासनाने पारित केला. जेव्हा कोणत्याही सामाजिक, धार्मिक, लग्न समारंभ कार्यासाठी प्राणी (घोडा, बैल आदि) मात्रांचा उपयोग करतो. तेव्हा खात्री करा की त्या प्राण्याची प्रकृती ठणठणीत आहे किंवा नाही. एवढेच नव्हे तर ढोल, डिजे वाद्याच्या मोठ्या आवाजापासून त्या प्राण्यांस दूर ठेवल्याची खात्री करा, रंग आणि फटाक्यापासून दूर ठेवा. पाणी, चारा, आणि सावलीची ही व्यवस्था करा.
या कायद्याचे पालन न केल्यास, लक्षात ठेवा पोलिस आणि पशूसंवर्धन अधिकारी घोडे मालक व ज्यांच्याकडील समारंभासाठी घोडे आणले गेले आहे. त्यांच्या वर सामुहिक दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुष प्रसाद यांनी दिला आहे.