साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
दुसऱ्याचे दुःख हे आपले दुःख या भावनेने कार्य करणाऱ्यांची संवेदना जागृत असते तेव्हाच सेवा घडते, असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे माजी अध्यक्ष व निर्माण ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अजित मराठे यांनी प्रतिपादन केले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोहळ्यात नूतन अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल जितेंद्र ढाके, मावळते अध्यक्ष कल्पेश शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ अजित मराठे यांनी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यासाठी पैशापेक्षा वेळ देणे जास्त महत्त्वाचे असून ते मोठे योगदान असल्याचे सांगून सेवेला साधनांची कमतरता भासत नाही असे सांगितले. सामाजिक जाणीवेतून कार्य करणाऱ्यांची काही उदाहरणे देखील त्यांनी सांगितली. रोटरी सदस्य झाल्यामुळे ग्लोबल सिटीझन होण्याबरोबर, विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींबरोबर मैत्री होते असेही ते म्हणाले. नूतन अध्यक्ष थोरात यांच्या घर वापसी, प्रेसिडेंट आपल्या दारी या संकल्पना आणि क्लबची या वर्षाची सेवा समर्पण या थीम बद्दल डॉ.मराठे यांनी कौतुक केले.
मावळते अध्यक्ष कल्पेश शाह यांनी मनोगत व्यक्त केले. दिनेश थोरात यांनी कार्य अहवाल सादर केला. सहप्रांतपाल जितेंद्र ढाके यांनी प्रांतपालांचा संदेश वाचून दाखविला. नूतन अध्यक्ष दिनेश थोरात यांनी रोटरी जळगाव सेंट्रलच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करून आगामी वर्षातील कार्याची दिशा स्पष्ट केली. यावेळी त्यांनी नूतन कार्यकारणी व कमिटी चेअरमन यांची घोषणा केली.
कार्यक्रमात डॉ. मराठे यांच्या हस्ते सेवा समर्पणचे बोधचिन्ह आणि राजेश चौधरी संपादित क्लब बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार यांनी तर परिचय डॉ.प्रिती पाटील यांनी करून दिला.आभार उपाध्यक्ष जितेंद्र बरडे यांनी मानले. नूतन अध्यक्ष व सचिवांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
सोहळ्यास सहप्रांतपाल उमंग मेहता, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. पंकज शाह, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, शहरातील सर्व रोटरी, इनरव्हील क्लबचे अध्यक्ष,सचिव, रोटरी सेंट्रलचे सर्व माजी अध्यक्ष, सचिव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.