मविआचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना तीन हजार मिळण्यासाठी प्रयत्न करणार

0
28

पातोंडाला खेळ पैठणीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी खा.उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन, धनश्री पाटील यांनी जिंकली ‘मानाची पैठणी’

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आज खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सोबत सुरक्षित बहिणी रहाव्यात यासाठी काम करायचे आहे.लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रूपये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर 3000 रूपये मिळावे.यासाठी प्रयत्न करणार अशी भावना शिवसेना नेते तथा माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली आहे.

पातोंडा ता.चाळीसगाव येथील माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून *”सन्मान कर्तुत्वाचा खेळ पैठणीचा”* *”जागर स्त्री शक्तीचा स्वाभिमानी बहिणींचा”* हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खान्देशी अहिराणी कलाकार पैसावाली ताई फेम तोंडाय आक्का विद्याताई भाटिया, अमळनेरनी जत्रा तथा घाल कपडा चाल चोपडा फेम शशीभाऊ मोरे, उंबरखेडचे सुपुत्र रिलस्टार तथा जय खान्देश भाऊ जय खान्देश फेम दीपकभाऊ खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते आई जगदंबेच्या प्रतिमापूजन व मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी दीपकभाऊ खंडाळे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जय खानदेश भाऊ जय खानदेश म्हणत कार्यक्रमात उत्साह भरला. माजी खासदार उन्मेशदादा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करत असतात. त्यांनी गिरणा खोऱ्याच्या समृद्धीसाठी सलग 28 तास गिरणेच्या प्रवाहात बसून नार पार योजनेसाठी आंदोलन केले. एखादा लोकप्रतिनिधी पाण्यात बसून आंदोलन करतो. याला गिरणा खोऱ्यासह राज्यात मोठा पाठिंबा मिळाला.मी देखील या आंदोलनात सहभागी झालो.आज त्यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी होतो आहे. याचा मला आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

*खेळ पैठणीचा रंगला*

यावेळी उपस्थित माता-भगिनींनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध भक्ती गीते सादर करून प्रेक्षकांचे वाहवा मिळविली.यावेळी स्पर्धकांनी आध्यात्मिक गिते,उखाणा, फॅन्सी ड्रेस, काव्य, फुगडी, गायन सादर करीत हजारो भगिनींना मंत्रमुग्ध केले. *पैठणी साडीच्या प्रथम विजेत्या धनश्री दिपक पाटील द्वितीय बक्षीस मिना तुकाराम माळी, तृतीय क्रमांक शुभांगी राहूल पाटील यांचा संपदा पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला*.

कार्यक्रमाला माजी.पंचायत समिती सदस्य अनुसयाबाई संजय पाटील,पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील नवदुर्गा वाघळी उत्सव प्रमुख प्रकाश सूर्यवंशी, प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष रत्नाताई पाटील,रिक्षा युनियन अध्यक्ष आबा साबळे, अशोक माळी, महिरे आप्पा, युवराज माळी, आशाताई महाले, सुनंदाताई राठोड, सामाजिक कार्यकर्ते संजय संतोष पाटील, माजी सरपंच रंगनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक महाले, स्वप्निल मोरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मीक महाले यांनी तर आभार सी आर पी संगीता पाटील यांनी व्यक्त केले.

पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
—————–
*लाडक्या बहिणी सुरक्षित बहिणी व्हाव्यात*
*उंमग सृष्टी परिवार संस्थापिका संपदा पाटील*
—————————-

ग्रामीण भागातील महिलांना येत्या काळात आत्मनिर्भर करण्यासाठी विवीध व्यवसाय व योजनांद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यांना शिलाई मशीनचे काम येते.त्यांना रेडिमेड कपड्याचा व्यावसायिकांशी जोडून आत्मनिर्भर करण्यावर उमंग परिवाराचा भर राहणार असून माझी लाडकी बहीण सुरक्षित बहिणी व्हाव्यात यासाठी मनोरंजनातून प्रबोधन यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी परिसरातील आत्मनिर्भर, कर्तुत्ववान आणि आदर्श माता,भगिनी यांची यशोगाथा सांगत त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सी.आर.पी. संगीताताई पाटील, सविता सोनवणे, गायत्री गुजर, मीनाताई माळी, वैशाली माळी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here