साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभागा-प्रभागात मोकाट असलेली हजारो डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी पशुसंवर्धन विभाग अद्यापही अनभिज्ञ राहिला आहे. कोणी म्हणतो आफ्रिकन स्वाइन फिवरसदृश्य आजाराने डुकरांचा मृत्यू झाला. त्यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याकडे मात्र यावल नगरपरिषद संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चर्चिले जात आहे. तसेच नगरपालिकेच्या कार्यवाहीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सविस्तर असे की, यावल नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या एक दीड महिन्याच्या कालावधीत अज्ञात आजारामुळे ८०० डुकरे मेल्याचे समजले. यावल शहरात ठिकठिकाणी डुकरे अदृश्य झाल्याने नागरिकांमध्ये समाधानकारक चर्चिले जात आहे. असे असले तरी डुकरे अज्ञात आजारामुळे मेल्याबाबत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, असे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, अनेक भागात दुर्गंधी येत असल्याने नागरिकही डुकरे मेल्याच्या घटनेस, वृत्तास दुजोरा देत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने यावल शहरात काही भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून डुकरांची तपासणी केली. तेव्हा त्यात त्यांना कुठलाही आजार आढळून आलेला नाही. यावल शहरात डुकरे कोणाच्या मालकीची आहेत. डुकरांची संख्या किती? आणि मेलेल्या डुकरांची विल्हेवाट कागदपत्रे कोणत्या उद्देशाने लावली? किंवा हजारो डुकरे मेल्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी आर्थिक उलाढाल झाली आहे का? याबाबतची माहिती यावल नगरपालिकेत आहे किंवा नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावल शहरात आफ्रिकन स्वाइन फिवर सदृश्य आजाराने हजारो डुकरांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती असली तरी या वस्तूस्थितीमागे यावल नगर परिषदेचा अक्षम्य असा हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणात झाला आहे. कारण यावल शहरात गल्लीबोळात नवीन विकसित भागात म्हणजेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा प्लॉट असलेल्या ठिकाणी व गटारीतील पाणी वाहून जात नसल्याने गटारीत घाण साचली आहे. तसेच मोकळ्या जागांवर शेवाळ दुर्गंधीयुक्त घाण मोठ्या प्रमाणात साचून आहे. साफसफाईकडे तसेच मोकळ्या जागा ठेवणाऱ्या जागा मालकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर यावल नगरपरिषद कारवाई करण्यास घाबरत असल्याने पर्यायी डुकरांवर विपरीत परिणाम झाला असेल आणि यापुढे आता घाणीमुळे यावल शहरात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावल नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे विभाग प्रमुख त्यांच्या सोयी आणि मर्जीनुसार कामे करून पूर्ण माहिती नसलेल्या तसेच झालेली कामे प्रत्यक्ष न दाखविता प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमार्फत बिले काढून घेत असल्याचे ठेकेदारी वर्गात चर्चिले जात आहे.
नगरपालिकेची तोंडी माहिती संशयास्पद
नगरपालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात गेल्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत आठशे ते हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आपण यापूर्वी पशुसंवर्धन विभागाकडे तोंडी माहिती दिली होती, असे सांगण्यात येते. परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे खापर पशुसंवर्धन विभागावर यावल नगरपालिकेने फोडले आहे. परंतु पशुसंवर्धन पथकातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेद तडवी यांनी सांगितले की, डुकराची विल्हेवाट नगरपालिकेने लावल्याने त्यांचे नमुने घेता आले नाही. (विल्हेवाट लावताना नगरपालिकेने सोयीनुसार विल्हेवाट लावली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो) तसेच यावल नगरपालिकेने पशुसंवर्धन विभागाला लेखी पत्र का दिले नाही तोंडी सूचना का दिली? पशुसंवर्धन पथकात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.तडवी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय धांडे, डॉ. मनोज पाटील, संतोष बंडे, डॉ. रतनलाल भगुरे यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत काही डुकरांचे पालक-मालक उपस्थित होते.