जळगाव : साईमत लाईव्ह
तालुक्यातील नंदगाव येथील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सुटले असून गावातील गटारी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरल्या आहेत.यामुळे गावात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गावातील पथदिवेही मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गावातील आबालवृद्धांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे गावकरी त्रस्त झाले असतानाच ग्रामपंचायत मात्र सदरच्या तक्रारींकडे कानाडोळा करून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिक हवालदील झाले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशातच नंदगावमधील निम्म्याहून अधिक गटारी या तुडुंब भरून या गटारींतील घाणपाणी गावातील रस्त्यांवरून वाहत आहेत. या दुर्गंधीमुळे गावातील आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ऐन पावसाळ्यात या घाणपाणीमुळे गावात विविध प्रकारची रोगराई पसरण्याची शक्यता बळावली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः गावातील लहान बालकांना याचा फटका बसल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.
तसेच गावातील पथदिवे हे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बंद पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळेस काळोखाचे साम्राज्य पसरून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू होऊनही बंद असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री काळोखात गावात अपघात किंवा चोऱ्या होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर सध्या गावातील मुख्य चौकाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काँक्रींटीकरणाचे काम सुरू असल्याने सार्वजनिक प्रसाधनगृह हे जमीनदोस्त करण्यात आले असून ग्रा.पं.कडून पर्यायी प्रसाधनगृह अपेक्षित होते. मात्र ग्रा.पं.ने जि.प.शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच दोन पत्रे उभी करुन नावालाच प्रसाधनगृह उभे केले असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्येच्या माहेरघराजवळच सदर सोय केल्यामुळे ग्रामपंचायत नेमके करतेय काय हा प्रश्न उपस्थित होतो.
सदर गंभीर समस्यांबाबत सरपंच भूषण पवार व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडे मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र आहे. यामुळे ग्रामपंचायतीसह नंदगावचे आरोग्यही रामभरोसे असल्याचे दिसत असुन सदरच्या समस्यांकडे त्वरीत लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवावा, अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सोनवणे यांनी केली आहे.