विहीर अनुदानात लुबाडणूक; आ. चव्हाण यांच्या पुढाकाराने गुन्हे दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी )
मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते. मात्र, यात तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच आ. मंगेश चव्हाण यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.
२८ एप्रिलरोजी दुपारी आ. चव्हाण यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरी मंजूर झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी कमिशन द्यावे लागते. हे कळताच आ.चव्हाण यांनी लुबाडणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत थेट शहर पोलिस ठाणे गाठले फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले या लुबाडणुकीत कोणते मासे समोर येतात याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. किती शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे तेदेखील लवकरच स्पष्ट होईल.
तालुक्यात हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र पंचायत समितीमधील रोहयो विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून २० ते २५ हजार रुपये लाच घेऊन तुंबड्या भरल्याच्या तक्रारी आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे येत होत्या. पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर तक्रारी घेऊन शेतकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण यांनी पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कानउघाडणी केली.
शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समितीमध्ये सिंडिकेट असून त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी दोन दिवसात तक्रार देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा. सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी – कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे ज्या अधिकाऱ्यांनी सामन्यांना लुटले आहे त्यांना सोडणार नाही, असेही आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.