विदर्भात ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
साईमत / मुंबई
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल होत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रविवारी, ५ एप्रिल रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत दिवसभर उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळ व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसला, तरी हवामानातील बदल लक्षात घेता सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या कोणताही ठोस इशारा नसला, तरी बदलत्या वाऱ्यांमुळे काही भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. वादळाच्या वेळी नागरिकांनी मोकळ्या जागेत न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत गारपीट, विजांचा कडकडाट आणि ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह तीव्र हवामान बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांत परिस्थिती अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
