नांदगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी
शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. कांदे हे काल आपल्या निवास्थानी नांदगावला (Nandgaon)दाखल झाले. यावेळी कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना कांदे यांनीं व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा (shirdi Saibaba)चरणी साकडे घातले होते. हा नवस फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे बुधवारी रात्री त्यांच्या हनुमान नगरातील निवासस्थानी पोहोचले.
राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली तरी विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. मतदारसंघाच्या विकासाकडे आपल्याला भर देण्याची गरज आहे. पुरातून उद्ध्वस्त झालेल्या नांदगावच्या वस्तीसाठी संरक्षक योजना असो की ७८ खेड्यांची नांदगाव शहराची पाणीपुरवठा योजना असो. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेकांनी अडथळे आणले. यासंदर्भात अनेकदा आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तक्रारही केली. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये, यासाठी आपण सर्व पातळीवर प्रयत्न केले.
पुढच्या कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्कीच मिळेल, असा आत्मविश्वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला. मतदारसंघात हाताच्या बोटावर असलेली शिवसैनिकांची नाराजी ही ‘विशिष्ट’ महत्वाकांक्षेतून आली आहे. मात्र त्यांचे गैरसमज दूर कारण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होणार,असे कांदे म्हणाले . तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली.