वरणगावात पाण्याची टंचाई, नागरिकांची पाण्याच्या ‘जार’वर मदार

0
16

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरवासीयांना १८ ते २० दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईमुळे नागरिकांना थंडगार ॲक्वा पाण्याचे जार खरेदी करून आपली तृष्णा भागवावी लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांची मदार पाण्याच्या ‘जार’वर अवलंबुन असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विवाह व इतर सोहळ्यात थंडगार पाण्याच्या ‘जार’ची मागणी होत आहे. मात्र, ‘जार’मधील थंडगार पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पाण्याचा हा धंदा सद्यस्थितीत चांगलाच जोर धरू लागला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

वरणगाव नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासीयांना १८ ते २० दिवसापर्यंत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. अशा पाणीटंचाईच्या बाबतीत स्थानिक सोशल मीडियावर राजकीय कलगीतुरा रंगला आहे. मात्र, असे असुनही पाण्याची समस्या अद्यापही मार्गी लागली नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जात आहे. अशा निष्काळजी मुख्याधिकाऱ्यांची नगरपरिषदेवर नियुक्ती झालीच कशी? किंवा कुणी शहरवासीयांना पाण्यासाठी वेठीस धरण्यासाठी तर त्यांची नियुक्ती केली नसावी? असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या काळातच शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचे दुर्मिळ दर्शन घडविणारे कोण? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मात्र, सर्व साधारण नागरिक या भानगडीत न पडता दैनंदिन थंडगार ॲक्वा पाण्याचे ‘जार’ खरेदी करून आपली तृष्णा भागवित असल्याने शहरवासीयांची मदार पाण्याच्या ‘जार’वर अवलंबुन असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही कष्टकरी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वरणगाव नगर परिषदेच्या सुरु असलेल्या नियोजन शुन्य ढिसाळ कारभाराकडे जातीने लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगर परिषदेचे पाणी पिण्यास योग्य?

शहराला १८ ते २० दिवसानंतर होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवणूक करून त्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. परिणामी, साठवलेले पाणी पिण्यास योग्य आहे का? असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. पाच वर्षापासून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम केव्हा मार्गी लागणार, याकडे पाण्याच्या टंचाईने त्रस्त झालेल्या शहरवासीयांना नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे संतापयुक्त वातावरणाची निर्मिती होत आहे. यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेण्याची वेळ आली आहे.

नागरिकांना नाहकचा भुर्दंड

शहरात उशिराने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना दैनंदिन थंडगार पाण्याचे जार खरेदी करतांना किमान २० रूपये नाहकचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातच सद्यस्थितीत सुरू असलेले विवाह सोहळे, धार्मिक व इतर कार्यक्रमांसाठी थंडगार पाण्याच्या जारची मागणी वाढल्याने शहरातील पाच विक्रेत्यांची पाण्याचे जार मागणीच्या ठिकाणी पोहचविण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातुनही शहरात पाण्याच्या जारची मागणी वाढत आहे. काही नागरिक नगरपरिषदेकडून होत असलेल्या (अशुद्ध) पाणी पुरवठ्यावर विसंबुन न राहता नजिकच असलेल्या आयुध निर्माणीच्या वसाहतीमधील सार्वजनिक नळावरून पाण्याच्या कॅन भरून आणतांना दिसत आहे. यामुळे याची नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होवू नये, यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणीचा गवगवा न करता तातडीने उपाय योजना करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here