चाळीसगाव तालुक्यात ३३ गावांमध्ये पाणीबाणीची स्थिती

0
15

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यात तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला आहे. त्यामुळे रोजच तापमान वाढत आहे. यासोबत पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होत आहे. चाळीसगाव तालुक्यात ३३ गावांमध्ये पाणीबाणीची स्थिती उद्भवली असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाने ‘मागेल त्याला टँकर’ देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुक्यातील ३३ गावांना सद्यस्थितीला ४६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मे माहिन्यात पाणीटंचाईच्या सावटाखाली येणाऱ्या गावांची संख्या ७० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी कमी पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विहिरींच्या भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे, गिरणा धरणात ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा दरदिवशी वाढत आहे. गिरणा धरण परिसरात तापमान ४४ अंशावर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे गिरणा धरणावर अवलंबून असलेली गावे तसेच चाळीसगाव शहर यामध्ये तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

शहरात नगरपालिका हद्दीत ८-१० दिवसांनी पिण्याचे पाणी येत आहे. खेड्यामध्ये तर काही गावांमध्ये १५ दिवसांनी टँकर पोहोचत आहे. त्यात विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहेरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव, पिंप्रीबुद्रुक, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चतुर्भुज तांडा, शेवरी, बिलाखेड, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र. दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा १, वाघळी या गावांचा समावेश आहे.

राष्ट्रीय जन मंच पक्षाच्या मध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना लेखी निवेदन देऊन, समक्ष भेटून त्याचा पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील ३३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात अजून ३५ बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा तालुकाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय जन मंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here