घरातील बाथरूममधील शॉकने मिस्त्रीचा बळी
साईमत/ पाचोरा / प्रतिनिधी
शहरातील हनुमान नगर परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. ४४ वर्षीय फर्निचर कारागिर धनराज सुखदेव मिस्तरी यांना घरातील बाथरूममध्ये वॉटर हिटरचा जोराचा विद्युत शॉक लागून जागीच बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऐकून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, धनराज मिस्तरी (रा. ए-वन काट्याजवळ, हनुमान नगर) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श केल्यावर त्यांना जोराचा शॉक बसला. यावेळी ते ताबडतोब बेशुद्ध झाले.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात वॉटर हिटरमुळे झालेल्या विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धनराज मिस्तरी हे फर्निचर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या शांत, मनमिळाऊ आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे परिसरात त्यांचा आदर होता. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे हनुमान नगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक धनराज मिस्तरी यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन बहिणी आहेत. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या परिवारावर मोठे दु:ख कोसळले असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
