
पिताश्री कै.कथ्थू चुणिलाल शिंपी यांच्या पुण्यस्मरणार्थ उबदार उलन ब्लँकेट भेट देवून मायेची ऊब दिली.
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून पारोळा येथील जि.प.प्राथमिक शाळा क्र.३ च्या ३६ गरजू बालक विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या विनंतीने व्यापारी अनिल शिंपी यांनी आपले पिताश्री कै.कथ्थू चुणिलाल शिंपी यांच्या पुण्यस्मरणार्थ उबदार उलन ब्लँकेट भेट देवून मायेची ऊब दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव शिवदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून दिपक कोळपकर, किशोर सोनवणे, माधवराव कथ्थू शिंपी, डॉ.गौरव पाटील, मालती शिंपी, दाते अनिल कथ्थू शिंपी व त्यांच्या धर्मपत्नी वैशाली शिंपी आदी उपस्थित होते.यावेळी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माधवराव शिंपी यांनी वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचा आदर्श आमचा परिवार असाच पुढे ठेवेल, असे प्रतिपादन केले.
गुणवंतराव पाटील यांनी कै.कथ्थूशेठ आमच्या सारख्यांसाठी एक आदर्श होते. अध्यात्मिकतेचे जीवनात किती महत्व असते याचे ते उत्तम उदाहरण होते, अशी भावना व्यक्त केली. उपक्रमात अर्चना सेवलीकर, दिपाली पाटील, तरन्नुम सैय्यद व नयना मराठे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन व आभार मनवंतराव साळुंखे यांनी केले. गरीब गरजू कुटुंबातील बालकांना ऊबदार ब्लँकेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरून, त्यांना कडाक्याच्या थंडीत मोठा दिलासा मिळाला आहे.


