Distribution of clothes : मलकापुरात उघड्यावर राहणाऱ्या गरजूंना उबदार कपड्यांचे वाटप

0
2

एक माणुसकीचा धर्म जोपासण्याचे कार्य केले.

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : 

थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची निकड लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी शहरातील उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब, बेसहारा व्यक्तींना स्वेटर, टोपी, मफलर देवून एक माणुसकीचा धर्म जोपासण्याचे कार्य केले.

मलकापूर शहरात मागील काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला असून उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब, बेघर आणि निराधार लोकांचे हाल अधिकच होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना उबदार कपड्यांची निकड ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध भागात जाऊन गरजूंपर्यंत स्वेटर, टोपी आणि मफलर वाटप केले. थंडीच्या लाटेत थरथरणाऱ्या व्यक्तींना उबदार कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. अनेकांनी अजय टप यांच्या या सामाजिक बांधिलकीचे स्वागत करत त्यांचा गौरव केला.

शहरातील मोकळी मैदाने, रेल्वे स्थानक परिसर, कॉटन मार्केट परिसर, बसस्थानक परिसर तसेच रस्त्यालगत उघड्यावर राहणारे व पाल ठोकून राहणाऱ्या कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन थंडीपासून बचावाकरीता स्वेटर, टोपी, मफलर सारख्या वस्तूंचे वाटप केले. त्यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. थंडीच्या दिवसांत ‘कोणीही उघड्यावर थरथरू नये’ यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतूक करत ‘जिथे माणुसकी असते, तिथे देवपणही उतरतं’ या म्हणीने त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजय टप यांचा हा उपक्रम केवळ उबदार कपडे देण्यापुरता मर्यादित न राहता समाजात माणुसकीची नवी चळवळ निर्माण करणारा ठरला आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here