साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरासह जामनेर तालुक्याला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण आजपर्यंत ९८ टक्के भरले आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढलेला नव्हता. त्यामुळे संबंधित अधिकारी बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करुन पुढचे निर्णय घेतील, अशी माहिती वाघूर धरणाचे उपअभियंता पी.एम.पाटील यांनी ‘साईमत’ला दिली.
जिल्ह्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात २० ते २५ दिवस खंड पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा वाढला आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाने वाघूर धरण ९८ टक्के भरले आहे. शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जळगाव शहर, जामनेर व तालुक्यातील पाणीटंचाई मिटली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण १३ मध्यम, तीन मोठ्या प्रकल्पात मिळून एकूण ८९.८९ टक्के जलसाठा जिल्ह्यात आहे. यामुळे खरिप हंगामातील कापूस व रब्बी हंगाम चांगला येणार आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणात ७५ टक्के साठा आहे. गिरणा धरणात ५६ टक्के पाणी आहे. अजून पावसाची शक्यता असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
धरणातील पाणीसाठा (टक्के) असा
धरणाचे नाव साठा गतवर्षीचा साठा
हतनूर ७४.९० ८०.२०
गिरणा ५५.३८ १००
वाघूर ९३.५७ ८९.६६
जिल्ह्यातील अंभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. मोर ९५.५८, अग्नावती ९.२८, हिवरा २३.७९, बहुळा ५०.८५, अंजनी ८२.७४, गुळ ८०.६६, भोकरबारी २१.७६, बोरी २८.३२, मन्याड ४०.२७ टक्के असा पाणीसाठा आहे. जळगाव शहरासह परिसरात मंगळवारी दुपारी अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अजून परतीचा पाऊस आलेला नाही. परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत राहू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाच्या सरसरीत वाढ लहान मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठा अजून वाढू शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे.