प. वि. पाटील विद्यालयाची ‘गांधी तीर्थ’ला भेट
साईमत/जळगाव/न.प्र.:
के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जैन व्हॅली येथे महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘गांधी तीर्थ’ म्युझियमला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालपणाच्या मोहनपासून ते महात्मा गांधी पर्यंतचा जीवनप्रवास अनुभवला. महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग व्हिडिओ ग्राफिक्स, ऑडिओ क्लिप, चार्ट, चित्र तथा मॉडेल्स पाहून विद्यार्थी भारावून गेले. जैन व्हॅलीच्या निसर्गरम्य वातावरणाचाही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
भेटीचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील, गायत्री पवार यांनी केले.