सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज
साईमत/पहूर ता जामनेर/प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज चाळीसगाव येथील क्रीडा संकुलात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नामांकित शाळांमधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत वृषालीने आपल्या चपळतेने, तंत्राने आणि धैर्याने उत्कृष्ट कुस्ती सादर केली.
उपांत्य फेरीत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यातही तिने दमदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि द्वितीय क्रमांकावर समाधान मानले. वृषाली ही शिपाई सुनिल पवार यांची ज्येष्ठ कन्या असून लहानपणापासूनच तिला खेळाची आवड आहे. तिला शारीरिक शिक्षण विषयाचे प्रशिक्षक चंदेश सागर यांचे कसून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले. शाळेत नियमित सराव, संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सहाध्यायी तसेच ग्रामस्थांनी वृषालीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.