मतदानाचा उत्सव पिंप्राळा हुडको प्रभागात रांगा रांगा नागरिकांची उपस्थिती
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
पिंप्राळा हुडको परिसरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मौलाना अबुल कलाम आझाद केंद्र आणि ज्ञानसाधना प्राथमिक विद्यालय या दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.
मतदान केंद्रांवर गर्दी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि एपीआय संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध कामगिरी आणि उपस्थिती केंद्रावर स्पष्टपणे जाणवत होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क राहून मतदारांना योग्य मार्गदर्शन करत होते.
मतदानाची वेळ संपायला अवघा अर्धा तास शिल्लक असताना केंद्रावर मतदारांची झुंबड उडाली होती. अनेक नागरिक घाईघाईने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धावपळ करत होते. प्रशासन आणि मतदान अधिकारी प्रत्येक मतदाराला सुरळीत मतदानाची संधी मिळावी, यासाठी सतत प्रयत्नशील होते. साडेपाच वाजता पोलिसांकडून गेट बंद करण्यात आले असून गेटमध्ये असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला.
मतदान केंद्रावर प्रशासनाचे आणि पोलीस बंदोबस्ताचे संयोजन लक्षवेधी होते. नागरिकांच्या उत्साहात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून आला, तर मतदारांच्या उपस्थितीमुळे प्रभागातील मतदानाचे वातावरण उत्साहपूर्ण राहिले.
