मनोरंजनातून मतदानाचे प्रबोधन; प्रभाग १६ मधील महिलांचा उत्साह ओसंडून वाहला
साईमत /जळगाव /प्रतिनिधी :
जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील ‘शिवम योगा सेंटर’ येथे प्रभाग १६ मधील महिलांसाठी नुकताच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि इच्छा दीपक अत्तरदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सण साजरे करताना महिलांना मतदानाबाबत प्रबोधन देखील देणे.
कार्यक्रमाची सुरुवात हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी उपस्थित प्रत्येक महिलेचे वैयक्तिकरीत्या स्वागत करून त्यांना हळदी-कुंकू लावून केली. दैनंदिन घरगुती कामांच्या व्यापातून महिलांना विरंगुळा मिळावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये संगीत खुर्ची, फुगडी, लंगडी आणि पारंपरिक गाण्यांच्या स्पर्धा समाविष्ट होत्या. अनेक महिलांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरला, ज्यामुळे संपूर्ण योगा सेंटर आनंदाने गाजला.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांना मतदानाबाबत दिलेले ‘लाईव्ह’ प्रात्यक्षिक. बॅलेट युनिटवर मतदान कसे करावे, एकावेळी किती जणांना मतदान करता येते, आणि अचूक मतदान पद्धती काय आहे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी मनात असलेल्या शंका विचारल्या, ज्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सविस्तर स्पष्टीकरण दिले.
प्रभाग १६ मधील शेकडो महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. “अशा कार्यक्रमांमुळे घरगुती ताण हलका होतो आणि उमेदवारांशी थेट संवाद साधता येतो,” अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाषणांवर भर न देता थेट जनसंपर्क आणि प्रबोधन करण्यात आले असल्यामुळे हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांचा प्रभागातील चर्चेत मोठा उल्लेख होत आहे.
