चाळीसगावला ईदगाह मैदानावर मतदान जागृती

0
32

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

जागतिक स्तरावर २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. जगात ५९ देशात निवडणुका होत आहेत. भारतातही यावर्षी सात टप्प्यात निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. अशातच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जागृत करून लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने मतदारांना जागृतीसाठी सायकल रॅली, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोकगीत आदी उपक्रम उपक्रम राबविलेले आहेत. ‘मतदान करा, देश घडवा’ ही भूमिका घेऊन सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांनी चाळीसगाव येथील ईदगाह मैदानावर मतदार जनजागृती प्रतिज्ञेचे वाचन केले. तसेच ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

येथील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांची नमाज पठण झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम हाफिज जुबेर यांनी मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत मुस्लिम बांधवाना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, हाजी गफूर शेख, मुख्तार कुरेशी, असलम मिर्झा, अजिज खाटीक, रफिक मनियार आदी उपस्थित होते.

चाळीसगावच्या इतिहासात प्रथमच ईदगाह मैदानाच्या आत येत वरील तीनही अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन एक सर्वधर्मसमभावाचे वेगळेपण जपले. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ‘आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेऊन याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करुन आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ अशा प्रतिज्ञेतून मराठी, हिंदी या दोन भाषेतून आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here