हिरवी झेंडी दाखवून तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याहस्ते प्रारंभ
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, सर्व कामे बाजुला सोडुन शंभर टक्के मतदारांनी निवडणुकीत मतदान करावे, हा भव्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वीप नोडल अधिकारी एन.जे.फाळके, सहा.नोडल अधिकारी एन.बी.शिंदे, आर.एम.वाघमारे यांच्यामार्फत मलकापूर शहरात १४ नोव्हेंबर रोजी तालुकयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याहस्ते तहसील कार्यालय येथुन सकाळी आठ वाजता रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन प्रारंभ झाला.
रॅलीत मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील कार्यरत सर्व शिक्षिका, मलकापुरमधील नूतन विद्यालय, आमची प्राथमिक शाळा, नूतन इंग्लिश स्कुल, लि.भो चांडक विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय, गो.वि.म.विद्यालय, हिराबाई संचेती कन्या शाळा अशा शाळांमधील शिक्षिकांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विधानसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदारांनी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन महिला कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले.
पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
यावेळी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भानगुरा शाळेचे मुख्याध्यापक निलेश सोळंके, ज्योती सोळंके, सचिन जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी हनुमान चौक तसेच बस स्टॅड चौक याठिकाणी उत्कृष्ट पथनाट्य सादर करुन पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान करण्याविषयी आवाहन केले. रॅलीत मलकापूर पंचायत समितीचे स्वीपचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी एन.जे.फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी एन.बी.शिंदे, आर.एम.वाघमारे तसेच महसूल, आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी समग्र शिक्षाचे अतुल पाटील, अमित राजपूत, नागेश बोधणे, अर्चना ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनिल खर्चे तर आभार पद्माकर पाटील यांनी मानले.