विद्यालयातील विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींची मतदार जनजागृती रॅली उत्साहात
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, सर्व कामे बाजुला सोडुन शंभर टक्के मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदान करावे, हा भव्य उद्देश डोळयांसमोर ठेवुन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार शिल्पा बोबडे, गटविकास अधिकारी उध्दव होळकर,
मुख्याधिकारी आशिष बोबडे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले, गटशिक्षणाधिकारी एन.जे.फाळके यांचेमार्फत मलकापूर शहरात शुक्रवारी रोजी ५०० विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून नूतन विद्यालय येथुन रॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीचे समारोपीय भाषणात सर्व अधिकारी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व नागरीकांनी आपआपल्या घरातील सदस्य, आपले शेजारी, आप्तेष्ट यांना येत्या विधानभा निवडणुकीत 100 टक्के मतदारांनी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करावा. मतदार म्हणुन आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरुक राहुन देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबुत होण्यास मदत होईल, असा महत्वपूर्ण संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
रॅलीत शहरातील नूतन विद्यालय, लि.भो. चांडक विद्यालय, गो.वि.म विद्यालय, हिराबाई संचेती कन्या शाळा, मुन्सिपल हायस्कूल शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी रॅलीत सहभाग घेतला. नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले, गटशिक्षणाधिकारी एन.जे.फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एम. वाघमारे, नूतन विद्यालयाचे प्राचार्य अविनाश बोरले, गो.वि.विद्यालयाचे प्राचार्य जयंत कुळकर्णी, चांडक विद्यालयाचे प्राचार्य जयंत राजुरकर, हिराबाई संचेती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका ममता पांडे, मीना सुपे, प्राजक्ता किनगे, अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच महसूल, आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच समग्र शिक्षाचे अतुल पाटील, नागेश बोधणे, प्रशांत देशमुख यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन तथा आभार शिक्षण विस्तार अधिकारी आर.एम.वाघमारे यांनी मानले.