बहिणाबाईंच्या जीवन कार्यावर उपप्राचार्य डॉ.साळवे यांचे व्याख्यान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन अर्थात विश्व लेवा गणबोली दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.पी.एन.तायडे, उपप्राचार्य सुनिता पाटील होते. यावेळी मराठी विभागाचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे कला आणि वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी बहिणाबाईंच्या जीवन आणि कार्यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्यांनी मराठी मनावर कसे गारुड केले आहे, त्याचे रसाळ भाषेत वर्णन केले. बहिणाबाईंची गाणी ही जीवन, व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांचे सांगड घालणारी आहे. विलक्षण प्रतिभा, सूक्ष्म निरीक्षण आणि वास्तव अनुभव या संगमातून बहिणाबाईंना गाणीस स्फुरली, असे प्रतिपादन डॉ. साळवे यांनी केले.
कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे सुधाकर ठाकूर आणि राजेश कोष्टी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी बहिणाबाईंची गाणी स्वतः: गात, उपस्थितांकडून बहिणाबाईंची गाणी गाऊन घेतली. कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार मराठी विभागाचे प्रा. दीपक पवार यांनी मानले.
