सुरक्षेच्या बळकट भिंती ठरताहेत निष्फळ…? सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा कारागृहासारख्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच दोन कैद्यांनी तिसऱ्या कैद्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (वय २०) हा कैदी शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बॅरेक क्रमांक १३ जवळ उभा होता. त्यावेळी शिक्षा भोगत असलेले कुणाल गोपाल चौधरी आणि अजय मोरे या कैद्यांनी विनाकारण ठाकरेला शिवीगाळ केली. पुढे त्याला बॅरेकमध्येच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर जखमी सोहम ठाकरेने थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत हल्लेखोरांविरोधात तक्रार दिली. त्यावरून दोन्ही आरोपी कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कारागृहाच्या चार भिंतीआड घडलेली ही हाणामारी म्हणजे कैद्यांच्या सुरक्षेबाबत मोठा गंभीर इशारा मानला जात आहे. आधीच तुरुंगातील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना अशा घटना प्रशासनाच्या दक्षतेवर बोट ठेवत आहेत. तपास सहाय्यक फौजदार सोनवणे करीत आहेत.