यावल ः प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून यावल नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने यावल नगरपालिकेच्या महत्त्वाच्या आणि दैनंदिन कामकाजात संबंधित तत्कालीन तसेच विद्यमान मुख्याधिकारी हेमंत निकम,यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने यांनी यावल नगरपरिषदेत कामकाज करताना,आपले कर्तव्य निभावत असताना तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आदेश वजा लेखी सूचनांचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव त्यांना जबाबदार केव्हा धरणार? याबाबत यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून तशी प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाल्याचे समजते.
यावल नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचेकडील स्थाई निर्देशानुसार यावल नगरपालिका हद्दीतील अनेक जमीन मालक विकासकांना जाहीर नोटीस देऊन प्रत्येकी २० लाख रुपयापासून ते ४१ लाख रुपये पर्यंतचा भरणा यावल नगरपरिषद खजिन्यात केलेला नाही. तो तात्काळ भरणा करण्यात यावा नाहीतर कारवाई करण्यात येईल. याबाबत अद्याप पावतो विकासकांनी प्रत्येकी १५ ते २५ लाख रुपयांच्या रकमा भरलेल्या नाहीत त्यावर मुख्याधिकारी आणि संबंधित स्थापत्य अभियंता यांनी काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच यावल नगरपरिषद पाणीपुरवठासाठी अतिरिक्त साठवण तलाव चौदाव्या वित्त आयोगातून बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी आधी प्रस्ताव मंजूर करून मुख्याधिकारी यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी सोलापूर येथील अनिल शामराव पाटील या कॉन्ट्रॅक्टरला कार्यारंभ आदेश दिला होता आणि आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांनी जी प्रशासकीय मान्यता दिली आहे त्या प्रशासकीय मान्यतेत अटी-शर्ती प्रत्यक्ष बघितले असता क्र.४ मध्ये योजनेअंतर्गत प्राप्तनिधीचा विनियोग विहित प्रयोजनासाठीच तसेच शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार होत आहे हे पाहण्याची जबाबदारी संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित इतर अधिकारी व कर्मचारी म्हणजे स्थापत्य अभियंता यांची असेल.या प्रकरणी कोणतीही अनियमितता झाल्यास संबंधित सर्वांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांंच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्ताव करण्यात येईल, इत्यादी महत्त्वाच्या अटी जिल्हाधिकारी जळगाव यांनी लेखी आदेशान्वये दिल्या होत्या आणि आहेत.
तसेच यावल नगरपरिषद वाढीव हद्दीत कॉलनी भागात पाईपलाईन टाकने संदर्भात ३ कोटी ६५ लाख २६ हजार ६६३ रुपयाची प्रशासकीय मान्यता देताना जिल्हाधिकारी जळगाव यांनी याप्रकरणी काम करताना कोणतीही अनियमितता झाल्यास संबंधित मुख्याधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल त्यानुसार झालेल्या कामाची आजची दयनीय अवस्था लक्षात घेता आणि तक्रारी लक्षात घेता जिल्हाधिकारी जळगाव यांनी मुख्याधिकारी हेमंत निकम आणि स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्यावर कारवाई केव्हा केली आहे किंवा नाही..? याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी याबाबत आता पुन्हा कार्यवाही सुरू झाल्याचे समजते.
यावल नगरपरिषद हद्दीत यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिच्चून जागा मिळेल त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत अनधिकृत अतिक्रमण सर्रासपणे सुरू आहे.मटण आणि चिकन विक्रेते दुकानदार तर कुठेही जागा मिळेल त्या ठिकाणी बिनापरवानगीने मटन विक्री करीत आहे.विविध बांधकामे करताना यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता कधीही बांधकाम ज्याठिकाणी सुरू आहे त्याठिकाणी भेट न देता बांधकाम बिना परवानगीने आहे किंवा कसे तसेच बांधकामासाठी परवानगी देताना बांधकाम करणारे त्यानुसारच बांधकाम करीत आहे किंवा नाही? याची खात्री करीत नसल्याने नगरपरिषद हद्दीत सोयीनुसार सर्रासपणे बांधकामे सुरू आहेत.
यावल नगरपालिकेच्या वसुलीवरसुद्धा मोठा विपरीत परिणाम झाला असून यावल नगरपालिकेच्या व्यापारी संकुलनातील अनेकांना कारवाई करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या परंंतु त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई न करता त्यांना न्यायालयात लाभ होण्यासाठी नगरपालिका वेळ काढू धोरण राबवित आहे.याबाबत यावल शहरात बेकायदा दुकानांची आणि अतिक्रमणधारकांबाबत तक्रारी असताना मात्र मुख्याधिकारी हेमंत निकम आणि स्थापत्य अभियंता योगेश मदने यांनी कारवाई केलेली नाही.यामुळे जिल्हाधिकारी जळगाव यावल नगरपालिकेच्या संबंंधित मुख्याधिकारी,स्थापत्य अभियंता किंवा इतर संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांंवर केव्हा कारवाई करणार..? असे अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहे.
स्थापत्य अभियंता योगेश मदने बदली करून घेण्यात यशस्वी..?
यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्या कालावधीत विकास कामांच्या अनेक महत्वपूर्ण कोट्यावधी रुपयाच्या योजना /कामे झाली. ही संपूर्ण कामे ठेकेदारांनी मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच केली आहेत किंवा नाही? कामांसंबंधी आलेल्या तक्रारीचे काय झाले..? कार्यारंभ आदेश यांच्या नावावर आहेत, त्या मूळ ठेकेदारांच्या नावावर प्रत्यक्ष कोणत्या होतकरू ठेकेदारांनी कामे केली? हे विषय वेग- वेगळे असले तरी वेगवेगळ्या ठेकेदारांनी आपल्या प्रभावानुसार सेटिंग करून पाहिजे तसा टेस्ट रिपोर्ट मिळवून कामे उत्कृष्ट झाल्याचे दाखले मिळून बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यावधी रुपयाची बिले काढून घेतली आहेत.याची खात्री मुख्याधिकारी आणि स्थापत्य अभियंता यांनी का केली नाही..? नगरपालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट काँक्रीटची कामे कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या लोकप्रतिनिधींच्या प्रभावामुळे आणि मार्गदर्शनाखाली झाली..? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून स्थापत्य अभियंता योगेश मदने यांनी आपली बदली करून घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांनी केलेल्या कामांची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय आणि त्यांच्या जागेवर नवीन स्थापत्य अभियंता आल्याशिवाय त्यांना यावल नगरपरिषदेतून जाऊ देऊ नये असे सुद्धा ठेकेदारांमध्ये बोलले जात आहे.