साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील वीज महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाला होता. त्यामुळे पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्रीपासून अंधाऱ्यात होते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. जळगाव येथील अधिकारी येऊन त्यांनीही ते सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. हे सर्व ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत. यापूर्वीही २०१७ मध्ये अशीच समस्या निर्माण झाली होती, अशीही नागरिकांमध्ये चर्चा होती.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वीज महावितरण कंपनीचे कार्यालय आहे. येथूनच परिसरातील गावांना तीन विद्युत ट्रान्सफार्मरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाला होता. त्यामुळे पाळधीसह परिसरातील गावातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. वीज पुरवठा ठप्प झाल्याने सोमवारी, १२ फेब्रुवारी रोजी बँक, पोस्ट आदींचे व्यवहार ठप्प झाले होते. आधीच बँका दोन दिवस बंद होत्या. त्यात हा प्रकार घडल्याने तेथील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना दळण, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागले. दूध व्यावसायिक तसेच ऑनलाईन चालणारे सर्व व्यवसाय यांनाही त्याचा फटका बसला.
याबाबत येथील उप अभियंता लोकेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे चोपडा येथून नवीन ट्रान्सफॉर्मर मिळाले आहे. ते बसविण्याचे काम सुरू होते. सोमवारी रात्रीपासून पाळधीसह परिसरातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत होईल, असे संबंधितांनी सांगितले.