ग्रा.पं.जवळच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दूषित ; प्रशासनाचे दुर्लक्ष
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी :
शहरालगत तथा पुनर्वसित रायपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळच तुंबलेल्या गटारीतील घाण पाणी थेट पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रायपूर हे शहरालगतचे पहिले गाव असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली भेट याच गावातून होते. मात्र, वार्ड क्र.१ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या १५० ते २०० फूट अंतरावरील गटारींची भीषण दुरवस्था झाली आहे. याठिकाणी घाण पाणी साचून राहते. तसेच मोकाट डुक्करे फिरताना दिसतात. याच ठिकाणी गटारीच्या घाण पाण्यातून घरगुती नळ कनेक्शन काढण्यात आले आहे. ते पूर्णतः उघडे आहे. नळाचे पाणी सुरू असताना पाणी वाहते. मात्र, पाणी बंद झाल्यानंतर त्याच नळावाटे गटारीतील घाण पाणी पाणीपुरवठ्याच्या पाईपमधून परत ग्रामस्थांच्या घरांपर्यंत जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दूषित पाण्यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरील भयानक दृश्य सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का…? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेत गटारीतील उघड्या अवस्थेतील घरगुती नळ कनेक्शन त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.
गावात अनेक ठिकाणी गटारींची दुरवस्था
रायपूर गावात अनेक ठिकाणी गटारींची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी गटारींचे बांधकाम झाले आहे. तेथेही देखभालीअभावी पाणी पुढे वाहत नाही. परिणामी एकाच ठिकाणी पाणी साचून डबकी तयार होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
