साईमत, यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरावल खुर्द, भालशिव पिंप्री, टाकरखेडा आणि बोरावल बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामासंदर्भात आणि दैनंदिन साफसफाई संदर्भात यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गु्रप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात केव्हा कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला उपस्थित राहतात किंवा नाही? ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात की बाहेरगावाहून ये-जा करतात? ग्रामसेवक ग्रामस्थांना कार्यालयात कोणत्या वेळेला कार्यालयीन कामकाजासाठी भेट देतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन गावातील सार्वजनिक ठिकाणच्या गटारी यांची साफसफाई वेळेवर आणि नियमित होत नसल्याने बोरावल खुर्द येथील स्वामीनारायण मंदिराजवळील गटार घाणीने कचऱ्याने तुडुंब भरल्याने दुर्गंधी येत असल्याने भाविकांसह ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी या ग्रुप ग्रामपंचायतीला भेटी देतात किंवा नाही आणि कामकाज कसे चालले आहे याबाबतची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे का? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामसेवकाने प्राथमिक दैनंदिन सुविधा ग्रामस्थांना वेळेवर उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थ यावल पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहे.