साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शहरात एकाला गावठी दारू विक्री करतांना अटक केली आहे. अशा धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढेही असेच धाडसत्र सुरु ठेवणार असल्याचे पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात सध्या सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू आहे. त्यामध्ये पाचोरा तालुक्यातही गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉपजवळ एका गावठी दारू विक्रेत्याविरोधात पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांना शरद शेलार हा अवैधरित्या गावठी दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.
मुद्देमाल जप्त करत कारवाई
त्या अनुषंगाने विलास पाटील व त्यांच्या पथकाने भारत डेअरी स्टॉप जवळील शरद शेलार याचे दुकानावर छापा टाकला. त्यात त्याच्या ताब्यातील २ हजार १६० रुपये किंमतीची तयार पोटलीतील ४० लिटर गावठी असा मुद्देमाल जप्त करत शरद शेलार याच्याविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. ही कारवाई पाचोरा येथील दारूबंदी विभागाचे दुय्यम निबंधक विलास पाटील, पोलीस कर्मचारी गिरीश पाटील तसेच नंदू पवार यांनी केली आहे.