साईमत मुंबई प्रतिनिधी
मुंबई – विधानभवनाच्या लॉबीत आज (दि. ४ मार्च) एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक वाद घडला. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी लॉबीतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत या दोघांमध्ये वाद सुरू झाला. व्हिडिओत दिसते की, भास्कर जाधव संतापलेल्या अवस्थेत म्हणतात, “परवा आम्हाला इथं राज्यपालांचे भाषण मिळाले नाही.” यावर सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, “बाप कशाला काढता, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का?”
या विधानावर भास्कर जाधव अधिक संतापले. कल्याणशेट्टी यांनी हे देखील स्पष्ट केले की, “तुम्ही सीनिअर सदस्य आहात.” यावर जाधव म्हणाले, “ठीक आहे, तुम्ही एवढ्यावर थांबा, मीदेखील थांबतो,” आणि वाद तात्पुरता शांत करण्याचा प्रयत्न केला.
पण हळूहळू वाद पुन्हा सुरू झाला. जाधव म्हणाले, “जर तुम्हाला परत तेच बोलायचे असेल तर मी काढणार… मग तुम्हाला काय करायचे आहे ते करा.” त्यावर सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले, “आम्हीही तुमचा बाप काढू.” यावर जाधव म्हणाले, “काढा, तुम्हाला काढायचा असेल तर काढा. आम्ही चुकीचे काही केले नाही. तुमच्याकडून शिकायची काही गरज नाही.”
वाद अधिक तीव्र झाल्यावर सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, “मी सत्ताधारी पक्षात आहे.” यावर जाधवांनी पुन्हा संताप व्यक्त करत “असू द्या सत्ताधारी पक्षाचे आणि आणखी २ मंत्री असू द्या… इथं खासगी काम कसे करता?” असा सवाल उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
विधानसभेत प्रवेश करताना सभागृहात जाण्यापूर्वी सदस्यांना स्वाक्षरी करावी लागते. या सहीच्या ठिकाणी आमदारांची गर्दी झाली होती. या गर्दीत भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद भडकला. अद्याप वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु दोघांमधील हा शाब्दिक चकमक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
