साईमत, प्रतिनिधी, जळगाव
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत खेडी येथे अद्यावत वारकरी भवन उभारण्यासाठी 7 कोटी रुपयांचा ठराव करून या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील 51 ठिकाणांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून 12 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याठिकाणी भव्य स्मारक साकारण्याचे काम बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश यावेळी ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मांडला. या ठरावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार सर्वश्री लता सोनवणे, आ.चिमणराव पाटील, आ.शिरीष चौधरी, आ. राजुमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थितीत होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, आगामी काळात विविध निवडणुकांमुळे आचारसंहिता लवकर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी कमी दिवस आहेत. तेव्हा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व राज्य शासकीय यंत्रणाच्या विभाग प्रमुखांनी योग्य नियोजन करून शंभर दिवसात प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तात्काळ पार पाडून 100 टक्के निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.