देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिनी विविध उपक्रम साजरे

0
40

विविध उपक्रमांनी लक्ष वेधले, देशाविषयी भावना झाल्या जागृत

साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी देशभक्तीमय वातावरणात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे देशवासियांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे देशाविषयी भावना जागृत झाल्या.

जनता महाविद्यालयात रंगारंग कार्यक्रमासह स्पर्धां

मलकापूर : येथील जनता कला, वाणिज्य महाविद्यालयात रंगारंग कार्यक्रमासह स्पर्धांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विकसित भारत’ ही थीम घेऊन यावर्षी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. हेच उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता महाविद्यालयातील इतिहास, एनसीसी व एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. मलकापूर ग्रामीण परिसरामधून आयोजित रॅलीतील ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या सात स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गीत गायनाचे परीक्षण डॉ. पूजा सावजी यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसन्नजीत शिरसाट, द्वितीय कन्या तायडे, तृतीय अंजली सुरळ्कर यांना मिळाला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ. पूनम बाहेती, प्रा. नाफडे यांनी काम पाहिले. त्यात पूनम परदेशी, प्रसन्नजीत शिरसाट, मयुरी पाटील यांना प्रथम तर यश तायडे, वैष्णवी मोरखडे यांना द्वितीय तर भावना ढोले, अतुल गवई यांना तृतीय क्रमांक मिळाला. निबंध स्पर्धेतील ३४ विद्यार्थ्यांच्या निबंधांचे परीक्षण प्रा.शारदा खाचणे यांनी केले. त्यात प्रथम ऋतुजा ज्ञानदेव खाडे, द्वितीय दुर्गा संजीव वानेरे, तृतीय धनश्री लोमेश पाटील, चौथा क्रमांक नेहा अनिल मोरे तर पाचवा क्रमांक सुमित दिलीप फुलपगारे यांना मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम आचल प्रमोद व्यवहारे, द्वितीय साक्षी उत्तम गंगतीरे क्रमांकाचे मानकरी ठरले. कथाकथन व काव्यवाचन स्पर्धेत अनुक्रमे अतुल रवींद्र संभाजी, पूनम कन्हैय्यालाल परदेशी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तीनही स्पर्धांच्या परीक्षणाची जबाबदारी डॉ. पूजा सावजी, प्रा. शारदा खाचणे यांनी यशस्वीपणे पार पाडली. चित्रकला स्पर्धेत २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात निकिता लक्ष्मण खर्चे प्रथम, पूनम परदेशी द्वितीय, नंदिनी दीक्षित तृतीय, कल्याणी पांडुरंग पाटील चौथा व भूमिका नारायण नागरी पाचवा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्चना राजपूत, प्रा. वृशाली मोहितवार यांनी केले. विविध प्रकारच्या सातही स्पर्धांमधील विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुणे अॅड.जी.डी.पाटील, प्राचार्य डॉ.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे संचालन प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तीनही दिवसांच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय छात्र सेनेचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. वाय.एस.राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील माळी यांनी केले. त्यांना प्रा.डॉ.आर.डी.इंगोले, प्रा.डॉ.पी.आर भोगे, डॉ. दत्तात्रय धुमाळे, प्रा. प्रीती नाये, प्रा.पल्लवी चौधरी, प्रा.दीपक डहाके, प्रा.अरुण बर्डे आदींचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरुड आश्रमशाळेत नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

फैजपूर, ता.यावल : पिंपरूड येथील कै.यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय अनुदानित मुला-मुलींची आश्रमशाळेत नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ होते. यावेळी माजी मुख्याध्यापक रामदास बैरागी, मुख्याध्यापिका कांचन नेहेते, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सामूहिक नृत्य सादर केले. आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी अनुदानित शाळा सुरू केली. त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन पुढे जावे. शालेय जीवनात त्यांना सुखसोयी सुविधा शासनाच्या नियमानुसार देण्यात येतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन पुढे जातील. त्याचा मनस्वी आनंद असल्याचे मनोगत माजी नगराध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी विवेक महाजन, शुभम महाजन, शिवदास महाजन, शिक्षिका, कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मुक्ताईनगरला ‘स्माईलिंग स्टोन फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम

मुक्ताईनगर : येथील स्माईलिंग स्टोन फाउंडेशन आणि पाचपांडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्यावतीने डॉ. प्रवीण पाचपांडे आणि डॉ. नीता प्रवीण पाचपांडे यांनी तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त २०० विद्यार्थ्यांना चि. अद्वैत प्रवीण पाचपांडे आणि कु. अवंतिका प्रवीण पाचपांडे यांच्या हस्ते खाऊसह पेनचे वाटप केले. कार्यक्रमाला कोथळीचे सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच पंकज राणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे, सदस्य मोहन कोळी, सदस्या मीराबाई पाटील, उमेश राणे (सदस्य), योगिता चौधरी (सदस्या), शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा सपकाळे, शिक्षक प्रदीप कोसोदे, शिक्षिका रत्नमाला चौधरी, सुनील वानखेडे, चंद्रप्रभा पाटील, मनीषा पाटील, शुभांगी वरुडकर, कांचन बाठे, डॉ. सह्याद्री किनगे (सी.एम.ओ), देवेंद्र ठोसर (मुख्य व्यवस्थापक) यांच्यासह सर्व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली होती.समाजसेवेच्या दृष्टिकोनातून उपक्रमाचे तसेच स्माईलिंग स्टोन फाउंडेशन आणि पाचपांडे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भुसावळला ‘हिंदवी स्वराज्य दिन’ पदयात्रा

भुसावळ : येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेला हिंदवी स्वराज्य दिन पदयात्रा मराठा महाविद्यालयाजवळील मार्गापासून सुरु होऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला. याप्रसंगी राष्ट्रगीत वंदे मातरम्‌ गायन झाले. देशभक्तीपर यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांचा जयघोष करण्यात आला. पदयात्रेत सुमारे २०० युवक, युवती सहभागी झालेल्या होत्या. पदयात्रेदरम्यान अग्रस्थानी राष्ट्रीय ध्वज आणि भगवा ध्वज होते. पदयात्रेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सर्व पदाधिऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here