मतदानाचे महत्त्व सांगून सेल्फी काढण्यास केले प्रोत्साहित
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकनिमित्त मतदार जनजागृतीसाठी ८ ते १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात जिल्हा आणि मतदारसंघ स्तरावर मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धानोरा झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेजच्यावतीने चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य योगेश पाटील, मुख्याध्यापक के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांच्या उपस्थितीत गावातून मुख्य रस्त्याने प्रभात फेरी मार्गावरून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यालयाच्यावतीने सेल्फी पॉईंट शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आला होता. तसेच गावातील चौकाचौकात सेल्फी पॉईंट ठेवून मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून सेल्फी काढण्यास प्रोत्साहित केले.
मतदानाच्या जागृतीसाठी लोकांना विविध घोषवाक्य, घोषणांनी विद्यार्थ्यांनी गाव दणाणून सोडला. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक ए.पी. शिरसाठ, देविदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याविषयी माहिती लिहून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्यांचा कारभाराविषयी विविध प्रश्नमंजुषाद्वारे विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित केले. कलाशिक्षक सिराज तडवी यांनी पोस्टर व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
पालकांनीही लिहून दिले संमतीपत्र
मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र लिहून पालक व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. पालकांनीही आम्ही मतदान करणार आहोत, असे संमतीपत्र लिहून आई-वडिलांनी स्वाक्षऱ्या करून मोबाईल नंबरचा उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांकडे परत पाठवले. यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक देविदास महाजन, वासुदेव महाजन, एल.डी.पाटील, सी.बी.सोनवणे, उषा मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.