साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव ।
वरणगाव फॅक्टरीत उच्च पदस्थ पदावर कार्यरत अधिकाऱ्याला सैन्य दलासाठी वापरण्यात येणाऱ्या बुंदकीच्या काडतूस चोरी प्रकरणी अटक केली आहे. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून घटनेतील आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे. सर्व प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण? त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संरक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपीला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते.
वरणगाव आयुध निर्माणीत (फॅक्टरी) सैन्य दल आणि इतर राज्यातील पोलिसांना आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे काडतूस केंद्र शासनाच्या संरक्षण विभागातर्गंत तयार व वितरीत केल्या जातात. त्यामुळे वरणगाव फॅक्टरी हा परिसर अतिशय संवेदनशिल आहे. याठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरूवातीपासूनच कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार २६ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास (लचिंग टाईम) सतीष जयसिंग इंगळे ए. ई. (एस.क्यु. ए. ई) विभागाचे अधिकारी हे त्यांच्या दुचाकीने घरी जात असतांना सी.व्ही. भारंबे (दरबान) यांनी आपल्या कर्तव्यानुसार त्यांची झडती घेतली होती. तेव्हा त्यांच्या दुचाकीत अम्युनिशेन ७.६२ ची एके ४७ शस्त्रात वापरले जाणारे पाच काडतूस आढळुन आले. त्यामुळे फॅक्टरी प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने आरोपीला गजाआड केले होते. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. घटनेचा तपास वरिष्ठ स्तरावरून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ही घटना देशाच्या संरक्षण विभागासाठी चिंतनीय बाब आहे. अशा अनेक प्रकारच्या घटना यापूर्वीही झाल्या असल्याने वरणगावसह परिसरात ‘शेतच कुंपण खातेय?’ अशा प्रकारची चर्चा रंग धरु लागली आहे.
आगीचे कारणही गुलदस्त्यात
वरणगाव फॅक्टरी हा परिसर अति संवेदनशिल भाग आहे. या भागात सर्व साधारण माणसाला प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असूनही फॅक्टरीच्या विभागात एक वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यावेळेस फॅक्टरी प्रशासन जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीने उपाय योजना करून जिल्ह्याभरातील अग्निशामक दलाच्यावतीने ही आग आटोक्यात आणली होती. मात्र, ही आग कशामुळे लागली होती? त्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संरक्षण विभागाच्या कार्य प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फॅक्टरी प्रशासनासह संरक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
वरणगाव शहराच्या गांधी चौक परिसरातील माळी वाड्यात रहिवासी असलेल्या एका फॅक्टरी कर्मचाऱ्याच्या घरात गेल्या ३० वर्षापूर्वी रात्री अचानक स्फोट झाल्याने परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले होते. यावेळी त्या कर्मचाऱ्याच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडर सही सलामत आढळून होते. त्यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झाला? या कारणावरून जिल्ह्याभरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, त्याचेही कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या पाच वर्षापूर्वीही फॅक्टरीतील किरकोळ स्फोटात फुलगाव येथील रहिवाशी असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अशा अनेक प्रकारच्या कारणामुळे फॅक्टरी प्रशासनासह संरक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपीला गोवण्याचा प्रयत्न?
काडतूस चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला या प्रकरणात मुद्दाम गोवले जात असल्याची कुजबुज सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणामुळे अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही यापूर्वी बंदुकीची काही काडतुसे बाहेर नेली असावी? असाही संशय व्यक्त होत आहे.