बैठकीत सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे निर्देश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायतीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित रजा रोखीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांनी दिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणींसह निवेदनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी, ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
बैठकीला सहआयुक्त नगरपरिषद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्य वातावरण, वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कायम नियुक्तीसंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आयोगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील संघटनांच्या मागण्या शासन स्तरावर धोरण निर्धारणासाठी आयोगास सादर करण्याबाबत निर्देशित केले आहे.
अहवालांची प्रत वेळेत आयोगास सादर करण्याचे आदेश
बैठक संपल्यानंतर सफाई कामगार संघटनांनी उपाध्यक्षांचा सत्कार केला. हा सत्कार श्री. सारवान यांनी नम्रतेने स्वीकारून सर्व अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आयोगाने सर्व संबंधित संस्थांना आपल्या कार्यवाही अहवालांची प्रत वेळेत आयोगास सादर करण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश देऊन बैठक झाल्याचे जाहीर केले.